Sunday, 19 February 2017

अपूर्व टीम

एक आटपाट नगर होत. घरांच्या आखीव रेखीव ओळींचं आणि गच्च वनराईने वेढलेलं
काही सुज्ञ पांढऱ्या केसांनी उच्च दाबाच्या तारांखालची जागा ताब्यात घेतली आणि कासव गतीने त्या जागेचा कायापालट करायला घेतला. जमलेली मंडळी स्वतचा पैसा वेळ खर्च करून त्या जागेला आकार देत गेली , हळूहळू त्यामधले एक एक जण निस्तेज होत गेले आणि नवी फळी तयार करण्याची गरज त्या नावेच्या कप्तानाला भासू लागली. एक फतवा निघाला आणि सर्व घरांमधून फिरला , त्यातून मग नवे गडी चुम्बकासारखे ओढले गेले त्या जागेकडे .
सुरुवातीला सर्वांनाच स्वावलम्बनाने हा गाडा पुढे न्यायचा उत्साह होता .... अधिकाधिक लोक या उपक्रमात सहभागी व्हावेत म्हणून काही कार्यक्रम घडवावा यातून वसंतोत्सव साजरा होऊ लागला ,
आता या अपूर्व टीम मध्ये प्रत्येकाचा पोत वेगळा , रंग वेगळा , विचार वेगळा आणि वय आणि वेग ही वेगळा
व्हायचं असं कि  टीमची समन्वयक ताण घेऊन घेऊन बेजार व्हायची आणि पुढच्या वर्षी नकोच तो वसंतोत्सव म्हणायची , वसंत यायच्या आधी मात्र जरा विषयाला धुमारे फुटले कि नव्या जोमाने प्लानिंग ला सुरुवात. प्रत्येक जण कल्पना सुचवणार काही जबाबदार्या आपसूक काही जणांकडे जाणार , शेवटपर्यंत कोण काय करताय याची गोळाबेरीज नाहीच होणार , नक्की किती लोक सहभागी व्हायला येणार याची शाश्वती नसणार...
ताणाचा पारा वर वर चढत जाणार आणि गमतीची गोष्ट अशी कि आपापल्या जबाबदाऱ्या एकेकट्याने च पूर्णत्वाला आणून टीम नि घडवून आणलेला वसंतोत्सव धमाल साजरा होणार....
कारण ध्येय एकच ... हा आपला परिसर आहे , त्याला सुंदर आणि अजून सुंदर ठेवता आले पाहिजे.
तर अशी ही कथा एका विविध वयाच्या , पार्श्वभूमी च्या आणि आवडीच्या  अपूर्व टीम ची.