Thursday, 13 July 2023

नेवराचा अभिषेकी सोहळा








नेवराचा अभिषेकी सोहळा 


   कित्येक वर्षांपूर्वी श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच्या आसमंत पुस्तकात दिवेलागण या लेखात नेवर वृक्षाच्या  फुलांचं गूढ आणि तितकंच सुंदर वर्णन वाचलं तेंव्हापासून तो वृक्ष,  त्याचं  ते पहाटे  पहाटेच बहर येऊन,  तो  संपवून  नंतर दिवसभर तटस्थ  नामानिराळे वागणं डोक्यात घर करून राहिलं  होतं .


   नव्या मुंबईत सिडकोने लावलेली काही नेवराची आटोपशीर झाडं नजरेस पडली होती पण वसईला राहणाऱ्या रमेशच्या फोटोंमधली झाडं आणि आजूबाजूला परिसर अनुभवण्यासारखा आहे हे लक्षात आलं होतं . फक्त तिथे जाऊन ते अनुभवण्याचा  मुहूर्त लागायचा होता.


   एप्रिल २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात शेवटी तो योग आला. विरारच्या एका बोट सफारीसाठी जायचं होतं . त्यासाठी मी आदल्या रात्री वसईला रमेशच्या घरी राहायलाच गेले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी नेवराचं  दर्शन घ्यायचं होतं आणि त्यासाठी वसई  भागातील एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे बावखल गाठावी लागणार होती.


   बावखल म्हणजे  गावागावांमधनं जपलेली अगदी लहानखुरी पाणथळ जागा . ज्यात पाणी खोलात असतं , दलदल असते आणि बाजूने उंच काठ असतात ज्यावर ही  नेवराची झाडं आपलं सुंदर  अस्तित्व टिकवून आहेत. पहाटे उजाडता उजाडताच आम्ही  पहिल्या झाडापाशी पोचलो आणि अवाक झालो. त्याचा तो सौंदर्यभार माझ्या नजरेत मावेना .



   साधारण तीसेक फूट उंच झाडाला सगळीभर  नाजूक लालसर काड्या आणि त्यावर पिवळे पुंकेसर असलेल्या फुलांच्या तोरणमाळा लटकलेल्या होत्या. त्यावर असंख्य माश्या भुंगे यांची लगबग सुरु होती.

 

वाऱ्याने त्या माळा हलके हलके झुलत होत्या . आणि लक्षात आलं की त्या नाजूक  फुलांचा अलगद  भुरुभुरु वर्षाव सुरु झालेला होता. अतिशय सुंदर दिसणाऱ्या त्या माळेतलं एकेक फूल अलगद सुटायचं आणि गरगरत जमिनीकडे झेपावायचं. सगळ्या आसमंतात ओढ लावणारा मंद असा सुगंध भरून राहिला होता.


बघता बघता  झाडाखाली लालसर फुलांचा गालिचा पसरू लागला.

 


या सुंदर क्षणांना कसं  कसं  साठवू तेच  समजेना. मोबाईल म्हणू नका कॅमेरा म्हणू नका सगळे काही टिपत गेले. छाती भरून श्वास घेऊन सुगंध साठवत गेले. झाडाखाली उभं राहून 'बहारो  फूल बरसाओ' गाण्यामधला मधला प्रियकराचा मेहबूब बनले.


चेहरा वर करून पडणाऱ्या फुलांचा स्पर्श अनुभवत राहिले. अगदी वेडावल्यागत स्थिती झाली होती माझी. 


    शेवटी रमेशनी घड्याळाकडे लक्ष वेधलं आणि सूर्य फार वर यायच्या आत अजून काही बावखल बघायची राहून जातील म्हणून मग तिथून पुढे निघालो. अजून एक दोन जागी थांबून पुन्हा एकदा  तोच अनुभव घेतला. 





यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या  झाडीतून आत पायवाट जात होती त्या झाडीच्या आत


शिरले. आत अजून एक पूर्ण बहरलेला वृक्ष होता. आणखी एक विलक्षण अनुभव.  इथल्या  तोरणमाळांमधल्या  फुलांचा अभिषेक खाली फोफावलेल्या  केळीच्या पोपटी रंगाच्या पानावर पडत होता.

 रंगांचा तो विरोधाभास अतिशय देखणा दिसत होता. 


 

आजूबाजूला अंधार वाटावा अशी गर्द  झाडी , जमीन आधी पालापाचोळ्यानी आणि त्यावर पडलेल्या नेवराच्या  फुलांच्या गालिच्याने सजलेली ,  खाली वर आजूबाजूला केशरी लालसर फुलंच फुलं.  त्यात तो धुंद  करणारा सुगंध . काही क्षण स्वतःला विसरून गेले. त्या आसमंताचा एक नि:शब्द भाग बनले . डोळे उघडले , भानावर आले . पाय निघत नसतानाही तिथून  निघाले पुन्हा भेटीची आस ठेवून.