मेळघाटला जाण्यासाठी
कोलकाता मेल पकडायला मी सीएसटीला पोचले तेव्हा एक माणूस मला भेटायला स्टेशनवर
येणार आणि प्रवासासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट आणून देणार हे माझ्या पक्कं डोक्यात
होतं. पण इतर चार सहप्रवासी भेटल्यावर मात्र गप्पांच्या नादात ही गोष्ट मी
पूर्णपणे विसरून गेले. गाडीची वेळ होती रात्री साडेनऊची. आणि कधी नव्हे ते गाडी
अगदी वेळेवरही होती. ९.२२ ला माझी ट्यूब पेटली की, अरेच्या, या माणसाचा अजून फोन
कसा नाही आला? फोन बघितला तर काय – फोन एरोप्लेन मोडवर गेलेला. झटपट फोनाफोनी केली
तेव्हा कळलं की तो माणूस बिचारा मला शोधत प्लॅटफॉर्मवर येरझार्या घालतो आहे. मी
डब्यातून बाहेर डोकावले, सुदैवाने तो माणूस जवळच होता आणि ती वस्तू माझ्या ताब्यात
आली. आणि घोळ होता होता वाचलं. पण पुढे ‘ घोळ होता होता जमलेला मेळ ‘ हेच आमच्या
अख्ख्या मेळघाटच्या ट्रीपचं सूत्र बनलं.
मिनिटाचाही उशीर न करता
आमची गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे खांडवा स्टेशनात पोचली. आम्हाला घ्यायला श्री.
हळबेकाकांनी दोन तरुण, तडफदार कार्यकर्ते पाठवले होते – ऋषिकेश आणि मयूर. त्या दोघा
तरुणांना आम्ही नक्की कोणत्या बोगीत आहोत, कितीजण आहोत, आमची नावं काय वगैरे काहीच
माहिती मिळालेली नव्हती. आणि तरीही ती दोघंजण बरोबर आमच्या बोगीच्या दारातच
आमच्या स्वागताला हजर होती. स्टेशनबाहेरील
जवळच्याच एका टपरीत गरमागरम चहा घेऊन आम्ही सगळे टेम्पो ट्रॅव्हलरने धारणीच्या
दिशेने निघालो. आधी साधारण कल्पना होती की या भागात मोबाईल नेटवर्क मिळण्याचा
त्रास होईल. पण धारणीच्यापुढे दिवसभर नेटवर्क नसणे आणि त्यातून मार्ग काढत
उद्दिष्ट्ये साध्य करणे किती , संयम कसाला लावणारे आणि जिकिरीचे असते याचा पदोपदी
प्रत्यय येत गेला.
धरणीला पोचल्यावर मस्तपैकी नाश्तापाणी करून आम्ही निघालो. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शिरून आम्ही कोल्लूपूरला डॉ. रविंद्र आणि डॉ.स्मिता कोल्हे यांच्या राहत्या घरी जाऊन पोचलो.
हे
दाम्पत्य घरी नव्हते. पण सूनबाईंनी स्वागत केले. आमच्या ऋषिकेशने त्यांच्या
प्रकल्पाची इत्थंभूत माहिती दिली. मेळघाटात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी कोल्हे दाम्पत्य
इथे आले. अत्यंत कष्टाने त्यांनी इथे कार्य केले. आरोग्यसेवा पुरवताना आदिवासींना
शेतीविषयक मूलभूत ज्ञानाची, कसदार बियाण्यांची माहिती पुरवणे अत्यंत गरजेचे आहे हे
त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यातच संशोधन करून आज ते कित्येक एकर जमिनीवर
बीजशेती फुलवत आहेत. आदिवासींना मार्गदर्शन करीत आहेत.
तिथून आम्ही निघालो ते लवादा या गावी. येथील संपूर्ण बांबू केंद्र ही मेळघाटची खासियत आहे. श्री. सुनीलभाऊ देशपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. निरुपमा देशपांडे हे असेच ध्येयवेडे दाम्पत्य. नागपूरहून मेळघाटात आले. या अविकसित भागातील समाजाच्या आपण कोणत्या पद्धतीने उपयोगी पडू हे चाचपताना त्यांना बांबूच्या संकल्पनेने झपाटले. आणि त्यांनी या कामाला सुरुवात केली. आता येथे बांबूकामाच्या प्रशिक्षणाचे वर्ग चालतात. बांबूच्या विविध जातींवर संशोधन चालते. बांबूची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे, स्थानिक लोकांना कारागिरी शिकवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे याचा प्रयत्न ही संस्था करत आहे. बांबूपासून अनेकविध वस्तू बनवण्याचा उपक्रम चालतात. त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण काम करतात.
गोष्टीवेल्हाळ
सुनीलभाऊंच्या समवेत इथल्या रुचकर भोजनाचा
आनंद अवर्णनीय होता.
मेळघाटातील धारणी
तालुक्यातील उतावळी येथे सेवाग्राम ट्रस्ट वर्धा यांच्या तर्फे एक रुग्णालय
चालवण्यात येते त्याचं नाव आहे महात्मा गांधी आदिवासी दवाखाना – माता आणि शिशु
रुग्णालय. सध्या भाड्याच्या जागेत तुटपुंज्या सोयींमध्ये हे रुग्णालय चालू आहे. पण
सेवाग्राम ट्रस्टचे एक विश्वस्त आणि आमचे हळबेकाका यांच्या पाठबळामुळे या
जागेपासून जवळच सात एकर जागेवर एका multy
speciality आणि अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी जवळ जवळ पूर्ण झाली असून लवकरच ते
कार्यरत होईल. सध्या ५० खाटांची सोय असली तरी भविष्यात १५० खाटांची सोय होणार आहे.
गांधीवादी वृत्तीच्या आणि धडाडीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शकुंतला छाब्रा यांच्या
मार्गदर्शनाखाली या रुग्णालयाची उभारणी झाली आहे.
मेळघाटासारख्या दुर्गम
आणि अविकसित भागात समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या या मंडळींचं कौतुक करावं तेवढं
थोडंच. मेळघाटात ऐंशी टक्के जनता आदिवासी आहे. वाहतुकीची अपुरी साधनं, अनियमित
वीजपुरवठा, संपर्काच्या साधनांमध्ये असणाऱ्या त्रुटी, टोकाचं हवामान, करमणुकीच्या
साधनांचा अभाव, अपुऱ्या शैक्षणिक सुविधा दैनंदिन गरजाही भागविण्याच्या बाबतीतील
मर्यादा यामुळे डॉक्टर मंडळी येथे येण्यास तयार नसतात. या असुविधांमुळे हा भाग
मागास राहिला आहे, कुपोषित राहिला आहे. ज्यांना मनापासून काम करायचं आहे
त्यांच्यासाठी खरं तर मेळघाट हे मोठे आव्हान आहे.
त्यानंतर आमचे बस्तान कोलकास येथील फॉरेस्ट रेस्ट हाऊसमध्ये नेऊन बसवले. सिपना नदीच्या एका सुंदरशा वळणावर एका उंच जागी हे रेस्ट हाऊस बांधण्यात आले आहे. तेथून दिसणारा नदीचा वळणदार प्रवाह आणि सूर्योदय दोन्ही दृश्ये अप्रतिम होती.
आता माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी जिथे राहून
गेल्या त्या जागेत आम्ही राहतोय म्हटल्यावर आमची चैनच होणार असं गृहित धरलेल्या
आम्हाला एकेक झटके बसत गेले. वीजेचे भारनियमन तर होतेच. पण मोटार बंद पडल्याने
नळाला पाणी नव्हते. पाण्याच्या तुटवड्याची आम्हा मुंबईकरांना काय कल्पना ! असो.
आम्ही बरोबर भरपूर खाद्यपदार्थ घेतले होते.
रात्री निजानीज झाल्यावर आणि भार नियमन सुरु झाल्यावर मूषकमामांना खमंग सुवास आला
नसता तरच नवल. सर्व खोल्यांमध्ये त्यांची दिवाळी सुरु झाली. ज्या दोघींना त्यांची
खरी भीती आणि किळस त्यांच्या खोलीत तर त्यांनी अक्षरशः नंगा नाच घातला. असो पण
त्याही परिस्थितीत आम्ही विविध – आणि विचित्र – वयोगटाचे आणि पार्श्वभूमीचे पाच सहल भिडू एकदम मजेत आणि
कमालीच्या आनंदात होतो.
पाहिल्याच दिवशी आम्ही संध्याकाळी पिली गावात आदिवासींची नृत्ये बघायला गेलो. गावात दुर्गोत्सव चालू होता आणि दोन गावातील चमूंनी आम्हाला त्यांच्या झिंग आणणाऱ्या घुंगुर. चिपळ्या, ढोलावरील बोलांच्या तालात ओढून नेलं. कोरकू आणि भिलाला आदिवासीची नृत्ये होती ती. मी तर थिरकत होतेच. पण हो नाही करत ६९ वर्षांची सुनीति आणि तिची ३५ वर्षांची क्षिप्रा यांनीही रिंगणात उतरून फेर धरला. मग राजश्रीलाही दोन पावलं टाकायचा मोह आवरता आला नाही.
आमच्यातला एकुलता एक पुरुष
फ्रँकलिन मात्र या साहसाच्या नादी लागला नाही.
मेळघाटात फिरायला येताना
दोन उद्देश होते. एक म्हणजे सातपुड्यातील हे जंगल जितक्या जवळून आणि मोकळेपणाने
अनुभवता येईल ते पाहणं आणि दुसरं म्हणजे कुपोषणासाठी आणि दुर्गमतेसाठी प्रसिद्ध
असलेल्या मेळघाटात चाललेली जेवढी जमतील तेवढी सामाजिक कार्ये बघणं. आणि जमलं तर गड
किल्ले पाहणं या कार्यक्रमात घुसवायचा अंतःस्थ हेतू होताच.
मेळघाटात वाघ आणि इतर प्राणी बघायला मिळणार की नाही ही उत्सुकता होतीच. पण ज्यांना जंगल आवडतं त्यांना जंगलाचा नुसता वाससुद्धा आनंदित करून सोडतो. मेळघाटचं जंगल हे एकाच प्रकारचं आहे. ब्रिटिशांच्या काळापासून करण्यात आलेली सागाची पद्धतशीर लागवड आणि इतर झाडांची कत्तल यामुळे बाह्य जंगलात फक्त सागाचेच साम्राज्य दिसते. कोरकू भाषेत सिपना म्हणजे साग. म्हणून या नदीचे नाव सिपना.
जंगलातील आमची पहिली पायी भटकंती होती ती भोला नावाच्या अत्यंत तल्लख अशा गाईडसोबत. निघाल्या निघाल्याच धनेशच्या ( हॉर्नबिलच्या ) आवाजाने माझे कान टवकारले गेले. भोला त्याचा माग काढत निघाला आणि लक्षात आलं की एक दोन नाही तर चांगले चार पाच काळे पांढरे धनेश तिथे आहेत.
त्यांची पुढे पुढे जाणारी
पकडापकडी बघत आम्ही पुढे निघालो. नदीच्या काठावर येईपर्यंत आम्हाला पल्लवपुच्छ
कोतवाल ( racket tail drongo ), टका चोर ( rufus treepie ), हळद्या ( oriole ) यांचेही दर्शन झाले. पुढे गुडघाभर पाण्यातून नदी पार
करावी लागणार होती. मग त्या गुळगुळीत निसरड्या गोट्यांवरून ( ही सिपना नदी पुढे
नर्मदेला जाऊन मिळते ) तोल सांभाळत हे दिव्य पार पडले. तेवढ्यात लक्ष गेलं ते
पात्राच्या काठाशी असलेल्या वाळक्या फांदीवर बसलेल्या खंड्या पक्ष्याकडे ( common Kingfisher ). त्याने
आपलं सावज चोचीत पकडून झटके देत खायला सुरुवात केली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात
त्याच्या पंखावरची चकाकी, मासा चोचीत धरून त्याला मारून खायची त्याची लगबग आणि
नंतर पोट भरल्यावर दिमाखात आजूबाजूला नजर फिरवणं – सगळंच लई भारी. इवलासा जीव पण
काय त्याचा तोरा आणि काय त्याची नजाकत.... लाजवाब !
हवेतला गारवा कमी व्हायला लागला तशी फुलपाखरांची शाळा भरायला लागली. त्यातली baronet जातीची फुलपाखरं तर आमचे वाटाडे असल्यासारखी आमच्या पुढे धावत होती. दोन प्रकारचे सुतार पक्षी आणि माझ्यासाठी पर्वणी ठरलेला शिलिंद्री ( Velvet Fronted nuthatch ) हे या ट्रेलचे आणखी काही खास क्षण.
ट्रेल
संपणार होती एका हमरस्त्यावर जिथे आमची ट्रॅव्हलर आमची वाट पहात उभी असणार होती.
उन चढत चाललं होतं. ज्येष्ठ मंडळींना थकवा जाणवायला लागलेला असतानाच आम्ही
हमरस्त्यावर पोचलो. आता हुश्श म्हणून बसावं म्हटलं पण लक्षात आलं की आपली गाडी नव्हतीच
तिथं. घोळ सुरु.... मग थोडा वेळ वाट पाहू, ... एखाद्या येणाऱ्या वाहनाबरोबर सेमाडोहला जाऊ म्हणेतो ट्रॅव्हलर
तिथे दाखल झाली. ... आणि मेळ जमला.
ग्रामीण भागातील आठवडी बाजार बघणे ही मजा काही औरच असते. चौकशी केली तेव्हा कळलं की एक दिवस हरिसालच्या बाजारात आम्हाला एक तास घालवता येणं शक्य आहे म्हणून. मग सकाळी भरपेट झालेल्या नाश्ताच्या शिदोरीवर भरवसा ठेवत दुपारच्या जेवणाला चाट मारून आम्ही ऐन दुपारी बाजारात दाखल झालो. मस्त रंगीबेरंगी प्लास्टिकची पालं लावलेली विविध प्रकारच्या अन्नधान्याची दुकानं, मिठाईची दुकानं, तसेच प्लास्टिकच्या खेळण्यांची आणि बहुविध उपयोगी वस्तूंची दुकानं यांनी बाजार फुलला होता. चकाकणाऱ्या चांदीच्या खास मेळघाटी दागिन्यांच्या दुकानांकडे आमची पावलं न वळती तरच नवल. पण नंतर ते ठसठशीत दागिने घेण्याची आपली ऐपत नाही हे ओळखून अंगठीसारखी वापरता येणारी जोडवी, नाजुकसे पैंजण घेऊन आम्ही मोकळे झालो.
दुपारी आमचा जंगल गाईड भोला आम्हाला हरिसाललाच भेटणं
अपेक्षित होतं. पण निरोप असा मिळाला की तो कोलकासला आमच्या रेस्ट हाऊसवर आम्हाला
भेटणार आहे.
पण भोलाला घेण्यासाठी आम्ही दवाखान्यात न जाता रेस्ट हाउसला गेलो तर निरोप मिळाला की भोला सेमाडोहच्या गेटवर भेटणार आहे म्हणून. अरेच्या ! जसा निरोप मिळेल तशी आमची वरात इकडून तिकडे फिरत होती. तिथे पोचल्यावर कळलं की जंगलात याच दिशेने प्रवेश करायचा आहे म्हणून. माझ्या विशेष आग्रहामुळे उघड्या जिप्सीतून सफारी होणार होती. ती आली आणि आम्ही दुपारच्या सफारीला निघालो. पाच एक कि.मी. गेलो असू नसू ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि तो तिची पाहणी करू लागला. म्हणाला, “ लाफा का ( पाट्याचे ) वेल्डिंग निकाल आया है. यह गाडी अंदर नाही लेके जा सकते है. “ झालं. गाडी परत फिरून सेमाडोहच्या तिठ्यावर आली. सुदैवाने दुसरी जिप्सी लवकरच मिळाली. तिच्या सीट्स आणि एकूण अवस्था चांगली वाटल्याने आम्ही म्हणालो, “ जो होतं है वह अच्छे के लिये ही होता है. “ या सगळ्या घोळात सफारी सुरु व्हायला तासभर तरी उशीर झाला होता. पण शिरलो एकदाचे आत. विविध पक्षी आणि फुलपाखरांच्या छायाचित्रणाचे प्रयत्न सुरु होते. तेवढ्यात भोलाने एका जागी गाडी थांबवायला सांगितली आणि तो झाडांचे शेंडे आणि खोडं निरखू लागला. ‘ फॉरेस्ट आऊलेट दिख सकता है ‘ म्हणाला. फॉरेस्ट आऊलेट म्हणजे ठिपक्यांचा जंगली पिंगळा. हे लहानगे पांढऱ्या भुवयावाले घुबड फक्त मेळघाटच्याच जंगलात सापडते. तेव्हा एक दुर्मीळ दर्शन होणार अशी अशा पालवली. आणि ते दिसलेही. भोलाच्या तल्लख नजरेला झाडांच्या गर्दीत ते बरोबर टिपता आले. त्याने त्याची जागा मला समजावून सांगेपर्यंत ते उडून आमच्या मागच्या झाडावर लांब जाऊन बसले.
माझी पूर्ण झूम वापरून शक्य ते शॉट्स मी घेऊन ठेवले.
पुढच्या फेरीत आम्हाला काही गवे दिसले.
साधारण तासाभराने आम्ही दुसरी वाट पकडली. तोपर्यंत लक्षात आलं
होतं की गाडी चढ नीट चढत नाहीये. आणि मग काय --- संध्याकाळी पाचच्या सुमारास घनदाट
जंगलाच्या ऐन मध्यभागी आमची गाडी बंद पडली. तपासानंतर कळले की गाडीने सर्व पेट्रोल
पिऊन टाकले आहे. घोळ अनुभवातील सरताज घोळ सुरु झाला होता. मेळघाटमध्ये कुठेही
मोबाईल रेंज मिळवणे हे एक मोठे दिव्य आहे हे तर खरेच. पण येथे पेट्रोल उपलब्ध असणे
हीही तितकीच अडचणीची गोष्ट आहे. छोट्या गावांच्या समुहात पेट्रोल पंपच नाहीत. पार
मोठ्या गावात जावं लागतं त्यासाठी. इथले पेट्रोलचे व्यवहार कॅनच्या पुरवठ्यावरच अवलंबून असतात.
भोलाला आता फारच
अपराध्यासारखं वाटू लागलं. आता काय करायचं याचा पाच मिनिटे विचार करून तो म्हणाला,
“ मैं जहां पे रेंज मिलेगी वहां तक जा के पेट्रोल मंगवाता हूँ. घंटेभरमें आ
जाऊंगा. “ पठ्ठा जंगल तुडवत धावत निघाला की टेकडीच्या माथ्याकडे. दोन टेकड्या पार
केल्यावर त्याला रेंज मिळाली. निरोप देऊन तो पुढे तसाच जंगल तुडवत रस्त्यावर येऊन
पोचला आणि पेट्रोलचा कॅन घेऊन येणाऱ्या माणसाबरोबरच आमच्यापर्यंत येऊन पोचला. या
सर्व द्राविडी प्राणायामात एक दीड तास गेला होता. बरं, इथे आम्ही काय करत होतो ?
जंगल सफारीत जे कधीही करू देत नाहीत ते म्हणजे गाडीतून खाली उतरणे. पण आम्ही खाली
उतरून जरा पाय मोकळे केले. बराच वेळ थोपवून ठेवलेले नैसर्गिक विधीही जंगलार्पण
केले. गोरजमुहुर्त गाठला होता, त्यामुळे फुलपाखरंही झोपण्यासाठी पानांच्या आड दडू
लागली आणि आमच्या कॅमेरात बंदिस्त झाली. 
गप्पा तर चालूच होत्या. अंधारु लागलं होतं. रात्र झाली आणि पेट्रोल आलं नाही तर काय याचा विचार करून झाला. थोडंफार सरपणही गोळा करून ठेवलं. गंमत म्हणजे आम्ही सगळेच डोंगरभटके असल्यामुळे प्रत्येकाच्या पोतडीत तहान लाडू -भूक लाडू होतेच. टॉर्च होते. त्याही परिस्थितीत कोणीही टेन्शनमध्ये नव्हतं. उलट थट्टा मस्करी, विनोदच चालू होते. – आणि एवढ्यात एकदाचा भोला पेट्रोल घेऊन आला. गाडीत पेट्रोल भरून आमची जंगल सफारी परत सुरु झाली. टॉर्च असल्यामुळे रात्रीच्या सफारीचाही (नाईटट्रेल) अनुभव मिळाला.
अशातच ऋषिकेशने सर्वांना एक कोडं घातलं की आपल्याला आता एक सरप्राईज आहे म्हणून. प्रत्येकजण आपापला कल्पनाविलास लढवू लागला. मला मात्र दुपारपासूनचा कार्यक्रम आठवत होता आणि एक मिसिंग लिंक लक्षात आली होती. भौगोलिक रचना अशी की पूर्वेकडे कोलकास, त्याच्या पश्चिमेला उतावळीचा दवाखाना आणि त्याच्याही पश्चिमेला हरिसाल. मूळ योजनेनुसार आम्ही हरिसालचा बाजार फिरून त्याच दिशेला असलेल्या जंगलात भ्रमंती करायची आणि नंतर वाटेत दवाखान्याच्या कॅन्टीनमध्ये रात्री खिचडी-कढी खाऊन रेस्ट हाउसला परतायचं असं ठरलं होतं.
आमच्या मूळ योजनेप्रमाणे आम्ही उतावळीच्या
रुग्णालयात जेवणार होतो. आणि या क्षणी मात्र आम्ही अगदी विरुद्ध दिशेला होतो.
रुग्णालयात पोचू शकणार नव्हतो. रेस्ट हाऊसमध्ये जेवण नव्हतं. मयुरशी काही केल्या
संपर्क होऊ शकत नव्हता. म्हणजेच आम्ही दुपारी जेवणाला चाट मारली आणि आता आमच्यावर
चाट होण्याची पाळी आली होती. तसेच रेस्ट हाऊसवर पोचलो . अपेक्षा
अशी होती की मयूर डबे घेऊन आमची तिथे वाट पहात असणार. भुका लागल्या होत्या. दहा
वाजले, साडेदहा वाजले. शेवटी नाईलाजाने आमच्या पोतडीतला कोरडा फराळ पोटात ढकलून
आम्ही झोपायला गेलो. आणि अकरा वाजता मयूर मोठ मोठाले डबे घेऊन रेस्ट हाऊसवर
अवतरला. त्याचा चेहराच सांगत होता की भरपूर घोळ घालून कशीबशी व्यवस्था करून तो आला
होता. त्याला बरे वाटावे म्हणून आम्ही तिघांनी चार घास खाल्ले आणि पलंगाला पाठ
टेकली.
दुसऱ्या दिवशी अगदी पहाटेच सफारी सुरु केली, अगदी वेळेवर. या खेपेला आम्हाला ठिपक्यांच्या जंगली पिंगळ्याचे छान मनासारखे शॉट्स मिळाले.
पावसाळा नुकताच संपला असल्याने
जंगलामध्येही भरगच्च हिरवाई दिसत होती. जमीन दिसतच नव्हती. त्यामुळे आम्हीही चार
पायांच्या प्राण्यांच्या शोधात नव्हतोच. आणि एक सांबर आणि अनेक गवे वगळता ते
दिसलेही नाहीत.
पण जंगलात सहजी न दिसणारे झाडचिचू ( tree shrew ) मात्र मस्त निरखता आले. झाडचिचू म्हणजे एक प्रकारची चिचुंद्री. एखाद्या मोठ्या खारी सारखी दिसते ती.
अगणित जंगली भले मोठे कोळी ( giant wood spiders ) आणि त्यांच्या मोठाल्या नाजूक जाळ्यात सापडलेले कीटक याचा नजाराही बघायला मिळाला.
एका गवताळ ठिकाणी एक गवा होता. असं वाटलं की तो एकटाच आहे. पण नंतर कळलं की एवढे मोठे हे अगडबंब प्राणी अनेकजण असून ही त्या गवताच्या जंजाळात बेमालूमपणे लपून बसले आहेत. एकेक करत त्यातले काही गवे उठले आणि एका राजबिंड्या तांबूस गव्याने आमच्या समोरच रस्ता पार केला. सकाळच्या उन्हात त्याची तुकतुकीत काळी शिंगे, पाठीवरची थिरकणारी काळी तांबूस लव, पांढरे मोजे घातलेले पाय आणि दमदार पावलं डौलात टाकत पुढे जाणारा तो गवा .... या अशा क्षणांसाठी तर आपण येतो इथे.
शेवटच्या दिवशी रात्री पूर्व कोजागिरी साजरी करायची कल्पना ऋषिकेशने मांडली आणि आमचे बस्तान वरच्या रेस्ट हाऊसमधून खालच्या रेस्ट हाऊसमध्ये हलले.
समोरच्या हिरवळीजवळ शेकोटी पेटवून द्वादशीच्या चंद्राच्या साक्षीने आम्ही मनसोक्त गाणी म्हटली. शेकोटीवर दूध तापवून ( तेही सहजगत्या उपलब्ध झाले नव्हतेच. घोळाशिवाय असा कार्यक्रम पूर्ण कसा होणार? ) ते प्यायला स्टीलची बाटली वापरून कोजागिरी साजरी झाली.
तीन उडत्या खारी बघायला मिळाल्या.
शेवटच्या टप्प्यात आम्ही
मेळघाटातील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणापासून जवळच गाविल गड हा प्रशस्त किल्ला
बघितला . तसेच बुऱ्हाणपूर नामक एक ऐतिहासिक शहर आहे. शहाजहानचे सासर. ताजमहाल
बांधून होईतोवर मुमताज बेगमचे शव येथील एका कबरीत ठेवण्यात आले होते. तिथेही
आशीरगड नावाचा किल्ला आहे. तिथे हि जाऊन आलो पण त्याबद्दल परत कधीतरी.
----- जुई खोपकर













































