Sunday, 16 April 2017

सिक्कीम मध्ये गवसलेलं रत्न

झुलूक असे गोडसं नाव असलेल्या साधारण नऊ हजार फुटावर असलेल्या  गावात आम्ही शनिवारी दुपारी पोचलो . डोंका भुतिया या साधारण साठीच्या आसपास दिसणाऱ्या सुस्मित चेहऱ्याच्या बाईच्या घरी दाखल झालो. सिक्कीम मध्ये homestay हि संकल्पना खूप छान रुजलीय . तर अश्या या homestay च्या दरीच्या काठावर असलेल्या आमच्या खोल्यांमध्ये  आम्ही बस्तान मांडले.
पान्गोलखा अभयारण्य हे या झुलूक पासूनच सुरु होते. पक्षीनिरीक्षणासाठी  इथे आम्ही एकंदर ३ दिवस राहणार होतो , त्यापैकी पहिले जवळपास २ दिवस या परिवारात नक्की कोण कोण आहेत याचा पत्ता लागला नव्हता तो दुसऱ्या दिवशी रात्री, आम्ही दोघी बायका जेंव्हा त्यांच्या राहत्या घरात ऊब घ्यायला गेलो तेंव्हा लागला. संध्याकाळी गारांचे वादळ झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता तर त्या बाईनीच आम्हाला गरम शेकोटी असलेल्या त्यांच्या खोलीत बसायला सांगितल . आत जाऊन बघतो तर काय एक पिटुकल दीड महिन्याचं बाळ , त्याची आई आणि त्याचा मोठा भाऊ असे एका  गादीवर विराजमान होते , त्या बाई चा मोठा मुलगा , आणि  आमचा ड्रायव्हर ही आले मग ऊब घ्यायला. इतका वेळ तो मुलगा( म्हणजे मोठा माणूसच ) आईला पोळ्या लाटून देत होता. आमच्या ड्रायव्हर नी आम्हाला तोंड ओळख करून दिली , 'ये  छ्म्बा,दो बार  एव्हरेस्ट  top कर के आया है ."
आम्ही उडालोच .खोलीत असलेले कुटुंब त्याचच होत  , त्याची बायको शेरिंग आणि त्याची पहिली भेट एका आर्मीच्या गिर्यारोहण मोहिमेतच झाली. ती  देहरादून ला आर्मी हॉस्पिटल मध्ये नर्स आहे .  छ्म्बा ही आर्मीत सुभेदार आहे  आणि आत्ता पर्यंत अनेक गिर्यारोहण मोहिमा करून आला आहे . नुसता सहभाग नाही तर दोन वेळा एव्हरेस्ट सर केलेय आणि ३ वेळा टीम सदस्य म्हणून सहभागी झालाय , वयाच्या १५ , १६ वर्षापासूनच तो गिर्यारोहण  करू लागला आणि आर्मीत आपल्या या साहसाला योग्य संधी मिळेल हे जाणवून सैन्यात  भरती झाला. ल्होत्से हे एव्हरेस्ट च्या बाजूचे आणि तंत्रानुसार चढायला कठीण असे शिखर  चढणारा पहिला भारतीय हा पठ्ठ्या होता , एवढेच नाही तर नंतर च्या मोहिमेत ऑक्सिजन शिवाय लोत्से शिखर सर करणारा पहिला भारतीय हि हाच ... हे सगळे ऐकून माझ्या तर तोंडातून शब्दच फुटेनात. बर हे सगळ कमी म्हणून तो पुढे  सांगता झाला की आता त्याची सुट्टी संपणार आणि त्याच्या J&K मधील बोर्डर फ्रंट वरील बंकर मध्ये पोस्टिंग होऊन जाणार. जिथे तापमान कायमच शून्याखाली असत आणि बंकर च्या बाहेर जगच नसत.बर हे ही पुरेस नाही म्हणून की काय तर तो म्हणे para jumper आहे त्यामुळे वर्षातून  ३ वेळा  तरी १०००० फुटांवरून  para jumping चा सराव करावाच लागतो ,  त्याच्या लोह्त्से च्या कामगिरीची दखल म्हणून छ्म्बाला राष्ट्रपतीं अब्दुल कलामांच्या हस्ते सेना मेडल मिळालेले आहे.
वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत इतकं काही कमावलेला superman जेंव्हा अतिशय अदबीनी आमची सेवा करत होता त्यांनी आम्ही अगदी  अवाक झालो होतो.
या अश्या रत्नाला घडवणाऱ्या आईची हि गोष्ट मग आम्ही जाणून घेतली .
साधारण १० वर्षाची असताना डोंका आपल्या बाबांच्या पाठीवरच्या टोपलीत बसून परिवारासकट तिबेट मधून सिकिम मध्ये आली. गंगटोक मध्ये वाढली आणि १३ व्या वर्षी लग्न करून झुलूक मध्ये आली. एकापाठोपाठ ५ मुलांचा  जन्म झाला आणि heart attack चे निम्मित होऊन तिचा नवरा तिला आणि लहान लहान पिल्लांना मागे सोडून हे जग सोडून गेला  . मग सुरु  झाली तिची वणवण . रस्त्याच्या कामावर जाऊन  , शिवणकाम विणकाम करत तिने  मुलाचं शिक्षण केल . शिवणाच दुकान टाकले . आज तिची सर्व मुल आपापल्या जगात स्थिरावली आहेत आणि लहानपणी अतिशय द्वाड असलेल्या आणि अभ्यास झेपत नाही म्हणून  शाळा  सोडून आजी आजोबांकडे पळून गेलेल्या मोठ्या मुलाने तर साऱ्या  भारताचे  नाव रोशन  करून टाकले.
भारताच्या उत्तरपूर्वे कडच्या एका पिटुकल्या राज्यातल्या एका पिटुकल्या गावात भेटलेला राष्ट्रपतीनी गौरवलेला असामान्य छ्म्बा, आणि घरामध्ये आईला मदत म्हणून भराभर  पोळ्या लाटून देणारा  , आलेल्या पाहुण्यांचं  आदरातिथ्य प्रेमाने  करणारा , समान उचलून द्यायला क्षणाचा हि विलंब न लावणारा ही छ्म्बाच ,

मी हा लेख त्याच्या पर्यंत पोचवीन तो पर्यंत तो कारगिल ला गेलें असेल माझी  पोस्ट त्याला तिथे मिळणारच नाही , तो पुढच्या सुट्टीत जेंव्हा येईल तेंव्हा आशा वाटतेय की त्याला माझा लेख नक्की वाचायला मळेल.
छ्म्बा नामग्याल भुतिया सगळ्यात उजवीकडचा 
लेखिका - जुई खोपकर