Tuesday, 31 October 2017

हॅलोविन दिवाळी आणि मी




ओक्लाहोमा विमानतळाहून ताईच्या रेंज रोव्हर गाडी मधून ती आणि मी त्यांच्या बंगल्याच्या संकुलांमध्ये शिरलो तिने बांधलेल्या या नवी घरी मी पहिल्यांदाच येत होते. अतिशय टुमदार अश्या बंगल्याच्या या संकुलात शिरल्यापासून  बहुतेक सर्वच दारासमोर ठेवलेल्या भोपळ्याच्या सजावटीची मनाने नोंद घेतली होती.



  
   ख्रिश्चन धर्मात ऑक्टोबरचा शेवटचा दिवस ऑल 'हॉलोज' डे किंवा ऑल 'सेंट' डे म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाआधीची संध्याकाळ म्हणजे हॉलोज इव्ह किंवा हॅलोविन. संत , विविध धार्मिक किंवा इतर कारणांनी मारले गेलेले लोक यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो. अमेरिका घडत असताना जगाच्या संर्व प्रदेशातून लोक इथे स्थायिक व्हायला आले आणि येताना  आपापल्या संस्कृती घेऊन आले . आयर्लंड मध्ये या दिवशी मोठ्या पांढऱ्या बीटाचे कोरलेले दिवे बनवून मृतात्म्यापासून संरक्षण करण्यासाठी सजवून ठेवत असत. तिथे भोपळे नव्हते. आयरिश लोकांची अमेरिकेत भोपळे ओळख झाल्यावर त्याचे जॅक-ओ-लॅन्टर्न  झाले. तसेच ट्रिक ऑर ट्रिट असा खेळ मुल खेळतात ज्यात भीतीदायक अशी वेशभूषा करून इतरांना घाबरवायचे म्हणजे ट्रिक करायचे , समोरच्यानी ट्रिक तरी करावे नाही तर ट्रिट द्यावी. अमेरिका वगळता इतर कुठे हे भोपळे कंदील सजवण्याची प्रथा नाही . किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणावर हा सण कुठे साजरा ही केला जात नाही.


तर , झालं होत असं कि ताई आणि मी अतिशय हळव्या मनस्थितीत तिच्या देशात तिच्या घरी येऊन ठेपलो होतो.पंधराच दिवसांपूर्वी आमची आई आम्हाला सोडून अनंतात मुक्त झाली होती. वीसेक दिवसात दिवाळी येणार होती, ताई तर यावेळी तशी ही मुंबईत तेंव्हा राहू शकणार नव्हती आणि मी ... मी काय करणार होते??...
ताई म्हणाली अमेरिकेत चलतेस काव्हिसा होता माझा झटक्यात निर्णय घेतला तिकिट काढलं आणि तिच्याबरोबर ओक्लाहोमा ला येऊन पोचले.
पंधरा दिवस कुठलाही अजेंडा न ठेवता केवळ मन आणि शरीर यांना दोन्ही पालक गमावल्याचा रितेपणा घालवायला दिवाळीच्या न झेपणाऱ्या उत्सवी वातावरणातून बाहेर काढायला हा ब्रेक उत्तम ठरला.
   ओक्लाहोमा हे शहर पठारी भागात वसलेलं आहे आणि मी इथे पोचले आणि ऋतू बदल व्हायला सुरुवात झाली.इथे आकाश विलक्षण स्वच्छ असतं पण त्यात ढगांनी चित्रकारी सुरू केली की डोळ्याचं पारणं फिटतं.
दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला आणि घटकेत बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम होत आकाशात ढग आणि जमिनीवर ऊन सावल्या थंडी सुरू होताना झाडांचे बदलणारे रंग अश्या दृश्य सोहळ्याची मी साक्षीदार झाले. फॉल कलर्स असा एक विलक्षण निसर्ग सोहळा युरोप , कॅनडा  आणि अमेरिका खंडावर बघायला मिळतो. हिवाळा सुरु झाला  कि हिरवीगार झाडे अक्षरशः कात टाकू लागतात आणि झाडाची पानं केशरी , विटकरी , पिवळ्या , लाल अश्या अनेक रंगांनी  न्हाऊन जातात. रंगांचा हा नजारा बघायला पर्यटक विविध जागा शोधून काढतात. ओक्लाहोमा मध्ये नुकत्याच या बदलाला सुरुवात झाली होती.












तर अश्या या रंगभऱ्या वातावरणात रोज दुपारी त्या बंगल्यांच्या वसाहतीत मी तासभर रपेट घ्यायला जायचे. माझ्या उपजत शोधक नजरेला रोज काही ना काही अद्भुत गमतीदार आणि सुंदर दिसायचंच.
त्यात एक अत्यंत अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ही मृतात्म्यांच्या सोहळ्याची सजावट.
अहो नुसते  भोपळे नाही तर खरेखुरे सापळे. ही गोरी मंडळी आपापल्या पितरांना अगदी याची देही याची डोळा बघायला आणि दाखवायला सरसावली होती.
अतिशय सुंदर घरे आखीव रेखीव लॉन आणि दारासमोर काय तर चक्क मानवी सांगाडे थडगी आणि त्यांचे स्मरणवाचक  दगड  पांढऱ्या कापडाची बनवलेली झाडाला लटकवलेली, हवेत झुलणारी  भुतं. बरं माणसं कमी की काय म्हणून माणसाचा मित्र कुत्रा त्याचेही सापळे घरासमोर सजवून ठेवत होते. या सजावटीत रोज होणारे बदल आणि वाढ मी निरखत होते.








बाप रे नशीब रात्री अनपेक्षित पणे हे दृश्य मला बघावे लागले नाही. अहो विचार करा शहराबाहेरच्या छान मोकळ्या माळरानावर तुरळक झाडीच्या आडोश्याला बांधलेली आलिशान टुमदार घरंआजूबाजूला अत्यंत तुरळक वस्ती रस्त्यावरचे मंद दिवे अश्या ठिकाणी तुम्ही घराचा  दरवाजा उघडता आणि दारात बाकावर एक मानवी सांगाडा त्याच्या कुत्र्यासकट विराजमान झालाय, असं दृश्य बघून निवांत झोप लागेल अश्या घरातपण इथे तर उत्साहानं भर पडत होती रोज  वस्तूंमध्ये.




अचानक मनात विचार आला विरोधाभासाचा ... इथे जशी उत्साहात सजावट सुरू आहे तशी भारतातही सुरू आहे की. दिवाळी तोंडावर आलीय. पण केवढा फरकएकीकडे विद्रूप बीभत्स रसाचा अंधाराचा गुढतेचा अविष्कार तर एकीकडे उजेडाचा झगमगाटाचा आणि रंगांचा सोहळा.
दिवाळी म्हणजे दीपोत्सव , दारापुढे अंगणात लक्ष लक्ष दिव्यांची आरास , सुबक रांगोळी ,वर लटकणारा षटकोनी आकाराचा दोन रंगी कागदी कंदील , झुंजू मुंजू झालेलं आणि हवेतला हवासा गारवा , अनार , भुईचक्र आणि लवंगी फटाक्यांचा कल्लोळ , सुगंधी उटण्यानी केलेली अंघोळ आणि मग नवीन कपडे आणि ताज्या फराळावर मारलेला ताव. जगाच्या एका भूभागावर ही मजा तर पृथ्वी गोलाच्या विरुध्द भागावर जीवाचा थरकाप उडवणाऱ्या सजावटी आणि वेश.
दोन संस्कृतीतला हा आहे कि नाही भारी विरोधाभास!
हॅलोविन म्हणजे मृत संतांच्या आठवणीप्रीत्यर्थ असणारा सण साजरा करताना आपल्या भोवती असली भीतीदायक सजावट पंधरा पंधरा दिवस करून ठेवण्यामागची मनोवृत्ती मला समजू शकली नाही.
नाही म्हणायला काही घरं होती जिथे लहान मुलांनी मोठाले भोपळे जरा सौम्य  वेगळ्या आणि आल्हाददायक रंगांनी रंगवून बाहेर मांडून ठेवले होते किंवा नुसत्याच भोपळ्यांची आरास केली होती ते छान आणि सुबक दिसत होतं. त्या संत आत्म्यांना किंवा पितरांनाही आपलं भल्या मार्गांनी स्वागत झालेलं आवडणार  हे नक्की.

 ही एक गोष्ट मनाला दिलासा देऊन गेली की सगळेच लोक काही बीभत्स रसाचा सोहळा करायला आतुर नाहीत.
आईच्या जाण्याने आलेल्या रितेपणाची जाणीव पंधरा दिवस एका वेगळ्या विश्वात राहून थोडी बोथट झाली.  आणि मग त्या नितळ  मनाने  दीपोत्सव पार पडलेल्या धुमधडाका ओसरलेल्या शांतावलेल्या भारतात परतायला मी विमानात बसले.
जुई खोपकर
Juee2012@gmail.Com

9820226171

No comments:

Post a Comment