Monday, 18 January 2021

पहिली एकल  सायकल सफर 


   


  पहाटेचा कुरकुरीत गारवा नाकातून आत शिरू पाहत होता , कानात घातलेले हेडफोन्स हळुवार आवाजात रफीचा मधाळ आवाज  ऐकवत होते . मोबाइल मधल्या ऍपच  माझी रपेट मोजण्याचं काम चोखपणे सुरु  होते. 

पाय त्यांची गती शोधून पेडल फिरवत होते आणि मी स्वतःवरच खुश होऊन एका नव्या साहसाला सुरुवात केल्याच्या आनंदात गुणगुणत होते. 

उरणच्या रस्त्यावर नव्यानेच उभारलेल्या शिवाजीमहाराज आणि समर्थ रामदास यांच्या आकर्षक पुतळ्यापाशी सकाळचा पहिला फोटो घेतला आणि विचार करायला लागले. 


संथ शांत असे जास्त  दिवस गेले कि माझ्या डोक्यात कीडा  वळवळायला लागतो . शरीराला कष्ट देणारं  साहस करायला जीव फुरफुरायला लागतो. 

या वर्षी ख्रिसमसची सुट्टी हलके फुलके काही गड चढून साजरी करावी असा मूळ प्लॅन होता पण मंडळी गळल्यामुळे  तो बारगळला आणि २०२१ मध्ये करायचा सोलो सायकलिंग चा बेत आत्ताच करायचा विचार सुरु झाला.


 परिसराचा आनंद घेत सायकलिंग करायचे असेल तर कोकण रस्त्यासारखे रस्ते नाहीत. इथे झूम झूम जाणाऱ्या गाड्या नाहीत , धूर ओकणाऱ्या ट्रक्स च्या रांगा नाहीत आणि चटके देणारे ऊन सुद्धा मोठ्या हमरस्त्यापेक्षा कमी. 

अनुभवी मित्रांशी चर्चा करून मी माझा रूट  सेट केला. सायकलची  गंजलेली चेन आणि सटकणारे गियर इंदरकडून नीट करून घेतले. 

 पॅनीयरच्या   ( कॅरियर ला अडकवता येण्याजोगी  सामान नेण्यासाठी बॅग  )  दोन बॅग मध्ये माझे अगदी मोजके कपडे , स्वच्छता आणि वैद्यकीय गरजेच्या गोष्टी पॅक केल्या. प्रवासात खाण्यासाठी चणे दाणे , खजूर , tang  आणि ज्यादा पाणीही  घेतलं.  पंक्चर  किट आणि हवा भरायचा पंप  सोबत ठेवला होता. वाटेत कुठे झालंच  पंक्चर  तर  पंक्चर कस काढायचं हे शिकून घेतलं होतं . हॅन्डल बार ला एक पाऊच होता त्यात पैसे , गॉगल केस आणि कॅनन sx ५० कॅमेरा बरोबर घेतला होता. बारच्या उजवीकडे हेडलाईट आणि मागच्या बारला टेल लाईट लावला. तशी खरतर दिवसाउजेडीच सायकल चालवणार होते पण लाईट्स निदान पहाटे तरी नक्कीच आवश्यक असणार होते. 
हेल्मेट , ग्लोव्हस रिफ्लेक्टिव्ह जॅकेट सायकलिंग शॉर्ट्स आणि आत पावलांपर्यंत  येणारी स्लॅकस्  असा माझा वेष असणार होता. 





  मुळात  स्वतःच्या धुंदीत सायकल चालवायला आपल्याला आवडतंय हे लक्षात आलं होतं पण जास्त लांबीचा सलग प्रवास मी अजून एकटीने केला नव्हता.  ते आता घडणार होते.  

सीबीडी बेलापूर ते थळ 
   २३ डिसेम्बरला सकाळी ६.45 ला सायकलवर टांग मारली तेंव्हा  हवा मस्त गारेगार होती. रस्ता माहितीचा होता. तरी  मधला नवीन ब्रिजेस चा घोळ झालाच. बरेच उलट सुलट मार्ग काढून

मी एकदाची करंजा जेटीच्या रस्त्याला लागले.


  जेट्टी वर पोचले तेंव्हा जेमतेम ९ वाजले होते. आणि बोट आलीच. सायकल आत चढवून मी वरच्या डेकवर गेले. 



.
चौफेर पसरलेला समुद्र आणि सीगल्स च्या सुळकांड्या बघत रेवस चा काठ गाठला. 












इथून पुढचा रस्ता छान हिरवाईतून  होता.  आधी कांदळवनांच्या मधून आणि मग रस्त्यालगत च्या दोन्ही बाजूंच्या घनदाट सावली देणाऱ्या झाडांमधून वाट अलिबाग च्या दिशेला जाते . माझी शोधक नजर आकाशात , झुडुपात ,झाडात लपलेले पक्षी शोधत राही. एका तळ्यात पेंटेड स्टोर्क चा थवा सापडला . एका झुडुपा आड सायकल लावून त्यांना दिसणार नाही या बेताने पुढे होत त्यांचे थोडे फोटो काढले.

















पुढे मांडवा बीच लागला , फारशी वर्दळ नसलेला बीच. प्रत्येक अलिबाग सफरीत इथे काही क्षण नयनसुख घेतल्याशिवाय पुढे जाववत नाही.


थोडं पुढे गेल्यावर एका झाडाच्या फांदीवर पसरलेले पंख सावरत एक मोठा पक्षी स्थिरावलेला दिसला .  काहीतरी विशेष मिळणार हे जाणवलं. चटकन सायकल लावून मी कॅमेरा काढला आणि झूम करून चक्क एक मोहोळ घार  oriental honey buzzard  कॅमेऱ्यात टिपली. एका दगडात दोन पक्षी च्या चालीवर ,एका सफरीत दोन गोष्टी घडल्या.






 मजेत सायकल हाकत साधारण ११.३० च्या सुमाराला थळ या अतिशय शांत  गावी पोचले. शहराच्या इतकं जवळ असून प्रगतीमुळे  आणि आधुनिकतेमुळे न बाटलेलं असं हे शांत गाव. 



नील आणि त्याच्या बाबानी इथली एक वाडी होम स्टे साठी चालवायला घेतली आहे. या वाडीत  नारळी पोफळीची सुंदर बाग आहे .








  एक  अजस्त्र अशी बांधीव विहीर 







आणि भरपूर मोठा  व्हरांडा , ऐसपैस  हॉल  आणि मोठ्या सुसज्ज  खोल्या असलेला प्रशस्त असा बंगला असं या वाडीचे रूप आहे. 




नीलला मी जेवणासाठी माश्याची फर्माईश केली होती. आणि सुखद गोष्ट म्हणजे त्यानी आणि त्याच्या बाबानी कोलंबीचं कालवण आणि हलव्याच्या तुकड्या अश्या काही चविष्ट बनवल्या की  जेवून ताटावरून उठणं जड झालं मला. 






संध्याकाळी जवळच असलेल्या बीच चा आस्वाद घेऊन आलो आणि दही भात  खाऊन मी  लवकर झोपून गेले. दुसरा दिवस लांबलचक असणार होता. 

थळ  ते श्रीवर्धन 
एक अंड पाव आणि चहा घेऊन सकाळी ६. ४५ ला थळहून निघाले .

 निघताना  नीलआणि अभि बरोबर भूभू सगुणा 
आणि माऊ सरकार स्वीटीचा निरोपही घेतला. 
















आज जवळपास १०० कि. मी. चा पल्ला गाठायचा होता.   सुरुवातीचा बराच  रस्ता साधारणपणे सपाटीचा होता . पहाट असल्याने वर्दळ तुरळक होती. 



नागाव मधून पास होताना सुक्या बाजाराची घाऊक विक्री चाललेली बघायला मिळाली. रंगीत साड्या  आणि फुलांच्या वेण्या घातलेल्या कोळणी भावाची घासाघीस करत मोठाल्या  वेताच्या टोपल्यामधली मासळी आपल्या टोपलीत,  कापडात घेत होत्या. तो क्षण मोबाईल मध्ये टिपून मी सायकलला टांग मारली. 






 कोर्लई गावाचा ब्रिज क्रॉस करून मुरुडच्या रस्त्याला लागले आणि . मध्ये मध्ये चढ उताराचा खेळ सुरु झाला.








 जाता जाता वाटेत एक पक्षी पडलेला दिसला. सायकल बाजूला लावून नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आलं कि हा eurasian wryneck नावाचा हिवाळी पाहुणा  पक्षी आहे. बिचार्याचे आयुष्य कुठल्यातरी वाहनाच्या पायदळी तुडवलं गेलं होतं. थोडं उदास व्हायला झालं पण शेवटी माणसाच्या तथाकथित प्रगतीच्या अनेक बळींपैकी हा ही  एक याची जाणीव झाली आणि सुस्कारा  टाकून पुढे निघाले.  


सगळा रस्ताभर झाडाचं छप्पर रस्त्याला मिळत होतं  त्यामुळे मुरुडला पोचेपर्यंत अजिबात उन्हाचा त्रास झाला नाही.



 १०.  ४५ च्या सुमाराला  मुरुडला चमचमीत मिसळ पावची पोटपूजा करून  










आगरदांडा  बंदराकडे निघाले.  जायच्या रस्त्यावरून उजवीकडे समुद्रात  बेलागपणे उभ्या असलेल्या जंजिरा किल्ल्याच सुंदर दर्शन घडत राहिलं .





 आगरदांड्याचा जरा अलीकडे खोकरीचा  पुरातन मकबरा  दिसला.  तीन इमारतींच्या या  पुरातन मकबऱ्यामध्ये बऱ्याच सिद्दी नवाबांच्या सरदारांच्या कबरी आहेत. आणि याच  स्थापत्यही  प्रेक्षणीय आणि विलक्षण आहे.  









मकबऱ्याची लांबूनच थोडी फोटोग्राफी करून आगरदांडा जेट्टीला पोचले.  

 या जेट्टीतून जाणाऱ्या फेरीमधून चार चाकी गाड्या , अगदी बस सुद्धा प्रवास करू शकतात. मी पोचले आणि पाच दहा मिनिटात बोट आली.  बोटीत बसल्या बसल्या खुशालीचे मेसेजेस पाठवले . साधारण वीसेक  मिनिटात आम्ही पलीकडे दिघी च्या बंदराला लागलो. .







 जास्त वेळ न दवडता लगेचच मी रपेटीला सुरुवात केली. कारण वेळ वाळू सारखा निसटून जात होता. भर दुपारी १ वाजता दिघीच्या पुढच्या कॉंक्रिट च्या भगभगीत रस्त्यावरून  जाताना उन्हाची जाणीव झाली. फक्त रस्ता सुरळीत असल्याने जितका वाढवता येईल तितका वेग वाढवला. मात्र हे सुख थोडाच काळ टिकलं. काँक्रिटच्या रस्त्याच्या लक्ष्मण रेषेपुढे जुना खड्डे दरडी भरला रस्ता माझी परीक्षा घ्यायची वाट पाहत होता. 



त्यातच घाट सुरु झाला. माझा वेग चांगलाच मंदावला. एकेक वळण अधिकाधिक चढावदार होतं . 
 आणि माझ्या स्वाभिमानाची परीक्षा पाहणारा प्रसंग सुरु झाला. एक वळणदार चढाव समोर आला जिथे  रस्त्याच काम करणारी काही माणसं  रस्ता झाडत होती. 
पुढे एका बाजूला ट्रकमध्येहि त्यातली काही माणसं  बसली होती. सगळी मंडळी माझ्याकडे अचंब्याने बघत होती. 
त्यात हा जीवघेणा वळणदार चढ . त्यांच्या समोर सायकलवरून उतरलं तर इगो दुखावला असता  . सगळी शक्ती पणाला लावून  १,१ च्या गियर कॉम्बिनेशन वर सायकल दामटली आणि लागोपाठ दोन चढ पार केले.
 प्रेक्षकांसमोर मान खाली गेली नाही. 
 ट्र्क  ड्रायव्हर च्या ' बाई दमली का काय' या शेलक्या वाक्याला  काहीही गरज नसताना लगेच प्रत्युत्तर देऊन मोकळी झाले.'  एवढ्या चढावर एवढं तर होणारच ना!'  


पुढच्या एका वळणानंतर  मात्र माझा बांध सुटला. अरे हे चढ संपणारच नाहीत का? एक तर रस्त्याला इतके उबडखाबड खड्डे होते , टेमके  टेंगळ आणि खडे यातून वाट काढायची आणि अंगावर येणाऱ्या चढावरून सायकल चढवत  न्यायची . अजून एक वळण गेल्यावर  मात्र मी जोरात ओरडले ,' आ आ आ  आता  पुरे की !' ओरडून झाल्यावर मागे पुढे बघितलं , माझ्या आवाजाने कोणी भेदरलं तर नव्हतं ना! 
रस्ता खिंडीतून जात  होता , माझा आवाज मस्तच घुमला होता . चिडचिड होता होता मला हसू फुटलं . काय मॅडपणा हा. चुपचाप सायकल वरून उतरले. दोन घोट टॅंग  प्यायले. आणि सायकल ढकलत चढाच्या शेवटापर्यंत नेली.

 थोडा श्वास घेऊन परत एकदा नव्या उत्साहाने पुढे निघाले. रस्ता बरा  होण्याचं नाव घेत नव्हता . एकदाचा  उतार सुरु झाला. वेग वाढवू म्हणता शरीराला इतके धक्के बसत होते की  परत एकदा तोंडात शिव्याशाप यायला लागले. बराच रस्ता मी पेडल वर उभं राहून तोल सावरत उतरला . जरा बरा  पॅच आला कि सुळकन जायची सायकल . आणि काही वेळा थोडं वाट काढण्याचं कौशल्य वापरलं तरी जमायचं. 

अखेर दिघी घाट संपला. जिथे संपला  तिथे एकुलतं एक हॉटेल होतं . त्यांच्याकडे पुढच्या रस्त्याची चौकशी करावी म्हणून थांबले . मला दिवे आगार मार्गे समुद्राच्या जवळून जायचं होते. 

श्रीवर्धन च्या मित्रालाही फोन लागला. किंबहुना त्याचाच आला. खरं म्हणजे कोकणात बहुसंख्य भागात फोनच नेटवर्क नीट नाही. पण इथे अगदी मोक्याच्या जागी नीट संपर्क झाला. त्याने रस्ता समजावला  आणि सकाळपासून अनेकदा विचारलेला मेसेज वरचा प्रश्न परत विचारला. 'घ्यायला येऊ का.' मला परत हसू फुटलं. 

 झालं होत असं कि आजच्या या लांबच्या रपेटीसाठी मी बॅक अप प्लॅन तयार ठेवला होता. मित्राला सांगून ठेवलं होतं , मी जर वाटेत दमले आणि तुला फोन केला तर सरळ  गाडी काढायची मला घ्यायला यायचं. त्या वर तो आगाऊ सकाळपासून च्या माझ्या प्रत्येक अपडेट नंतर मला मेसेज करत होता . 'घ्यायला येऊ?' 
हे असे माझे मित्र . मैत्रिणीच्या कर्तृत्वावर एवढा अविश्वास चांगला मित्रच दाखवू शकतो बहुतेक. 

तर मित्राच्या फोन संवादातला रस्ता समजावण्याचा भाग उरकला आणि तो मला विचारता झाला , मग आम्ही जेवून घेऊ ना? तुला अजून खूप वेळ लागणार. घड्याळात पाहिलं तेंव्हा २ वाजून गेले होते. मी त्याला हो सांगितलं आणि हॉटेलात एक स्प्राईट मागवलं. खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. सोबत घेतलेले खजूर आणि मूठभर शेंगदाणे तोंडात टाकले. 
आता दुपारचं ऊन परिणाम करायला लागलं. नशिबाने पुढचा बराच रस्ता खड्डेविरहित होता. अगदी दिवे आगर पार करून पुढे भरडखोल  च्या रस्त्याला लागेपर्यंत .  

दिवे आगर ला जाताना वाटेत मला अजून एक नवलाईचा पक्षी मिळाला. Montague's harrier .

लांबूनच त्याची भरारी बघत होते आणि सायकलचा वेग वाढवून त्याच्या योग्य रेषेत यायचा प्रयत्न करत होते . पाऊच मधून कॅमेरा काढून फोटो घेईपर्यंत तो सूर्याच्या रेषेत गेला आणि फोटोत काळी आकृती आली . थोडी वाट बघून परत नेम धरला कारण हॅरियर घिरट्या घालत होता. आता मात्र ओळख पटू शकेल इतपत बरा फोटो मिळाला. 






 दिवे आगर आलं आणि गावामधून जाताना दुतर्फा असलेल्या होम स्टेच्या संख्येने  मी अवाक झाले. अक्षरशः प्रत्येक घर हॉटेल होते. हे असं बाजारीकरण कधी झालं? एवढे पर्यटक येतात ? नवलच होते.

आता अजून एक घाट आला . रस्त्याची अवस्था परत तशीच उबडखाबड. . मला समुद्र दिसायची ओढ लागली होती आणि इथे रस्ता मात्र वर वरच चालला होता . मनातल्या मनात सायकलिंगची ही  आगाऊ खाज पूर्ण  करणाऱ्या स्वतःला नाव ठेवत होते. कोणी सांगितलं होते तड्फडायला. झेपत नसेल तर गप बसावं घरी. मी रस्ता चुकले तर नाहीय ना? मग डोंगरात आत आत कुठे चाललंय हा रस्ता?  एक ना अनेक  विचार नुसते भराभर थैमान घालत होते . एकीकडे शरीर त्याचे  चाकांची गती कायम ठेवण्याचं काम मात्र चोख करत होते. 

आणि हुश्श  एका खिंडीनंतर मात्र पलीकडे समुद्राची भेट घडली. रस्त्याचे चढ बरोबर लगेचच उतार  घेऊन यायला लागले.


 नैसर्दिक बंदर कसं  असतं  हे मला भरडखोल ला बघायला मिळालं. समुद्राच्या काठाजवळची  खडकाळ जमीन मधेच दुभंगली होती आणि काठाकडे असणाऱ्या जलाशयात येण्याजाण्याचा एक पाण्याचा मार्ग तयार झाला होता. मी उंचावर असल्याने हि भौगोलिक रचना सुस्पष्ट कळत होती. बोटींची ये जा एवढ्या उंचावरून मजेदार वाटत होती. 


एका ठिकाणी रस्त्याच्या पातळीवर लांबवर पसरलेला सागर आला. चटकन सायकल छानश्या झाडाशेजारी उभी  केली आणि अथांग पसरलेल्या समुद्राच्या  पार्श्वभूमीवर माझ्या या कणखर सुंदरीच सुंदर चित्र टिपलं.
 


थोडं पुढे गेल्यावर  वडाच्या डेरेदार सावलीखालचा एक  बांध बघून थोडी टेकले. पाय लांब पसरून पाणी , टँग  पीत चांगली १० मिनिटे विश्रांती घेतली.  थोडे चणे शेंगदाणे पोटात ढकलले . आता दिवसाचा तिसरा प्रहर सुरु होत होता. लवकरच सूर्य मावळतीला येणार होता. मला अंधार पडायच्या आत श्रीवर्धन गाठायचे होते. पण ऊन आणि दिवसभराचे श्रम यामुळे माझी शक्ती लवकर लवकर संपत होती. 


 सुखाची एक गोष्ट म्हणजे उजव्या बाजूला समुद्राची पुळण सतत साथ करत होती . आणि  पाणी कलत्या उन्हात प्रखर चमकत होत तरीही सुंदरच वाटत होत. 










अजून थोड्या चढ उतार झोक्यांनंतर एक नारळपाणीवाला सापडला. परत एकदा विश्रांती ब्रेक घेतला आणि  मनसोक्त नारळपाणी पीत बसले. 


 तेवढ्यात आकाशात लक्ष गेलं. एक समुद्र गरुड white bellied sea eagle माझ्या समोर आडव्या पसरलेल्या टेकडीच्या  एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे तरंगत येताना दिसला. तत्क्षणी हातातलं शहाळं  खाली ठेवून सायकल कडे धावले. पाऊच मधून कॅमेरा काढला आणि झटक्यात गरुडाकडे रोखला. त्याच राजबिंडं रूप कॅमेऱ्यात साठवलं आणि मला आनंदच उधाण आलं. हे असं शारीरिक कष्टाच्या छंदाच्या  वेगळ्या मिशन वर असताना दुसरा छंद ही पुरवता येणं  यासारखी धमाल नाही. 



आता किलोमीटर म्हटलं तर फार राहिले नव्हते . अवघे ८ किलोमीटर राहिले होते. फक्त ते पार करण्यासाठी अजून एक सत्व परीक्षा पार पडायची होती. एका ठिकाणी लक्षात आलं कि आपल्या समोर तर एक डोंगररांग येत चाललीय. हि पार करावी  लागणार. तितक्यात मित्राचा फोन आला. तो म्हणे अजून कशी नाही पोचलीस ? म्हटलं तीन कि मी दाखवतंय आता. तो म्हणे  म्हणजे घाट आला असणार . म्हटलं हो.  चला लाव जोर. आपलं इच्छित ठिकाण इतक्या सहजी पदरी पडणार थोडंच? 

मग काय लागले शक्ती गोळा करून पेडल हाकायला. चांगला दिड  दोन कि मी चढ चढल्यावर शेवट एकदाचा उतार आला आणि पुढच्या १० मिनिटात श्रीवर्धन शहरात प्रवेश करती  झाले. माझ्या मित्राचे घरासमोरच  मेडिकल स्टोर आहे . अर्थात ही  काही त्याची खरी ओळख नाही. त्यांच्या कुटुंबाचा सुपारीचा पिढीजात धंदा आहे. जुने नावाजलेलं नाव आहे इथे त्यांचं. 

तर चुन्याच्या भक्कम भिंती,  सागवानी तुळया आणि खांब असलेल्या  शंभर  एक वर्ष जुन्या अश्या त्यांच्या घराच्या अंगणात सायकल वळवली आणि एक मोठा पल्ला गाठल्याचा आनंद झाला. 










स्वागताला तो,  त्याची बायको हजर होते. यापुढची संध्याकाळ आणि दुसरा दिवस मी त्यांच्या ताब्यात असणार होते. घरात असणारे  चार वयोवृद्ध,   मित्राची दोन मुलं आणि हि दोघे असा मोठा राबता घरात होता. पण माझ्यासाठी हे घर नवख नसल्याने दोन दिवस कसे सरले समजलंच नाही.

पोचल्याबरोबर  संध्याकाळी कढत पाण्यानी अंघोळ आणि गरमागरम चहा झाला. रात्री श्रमपरिहार आणि माझ्यासाठी खास  बाहेरून मागवलेलं  चविष्ट चिकन . दुसऱ्या दिवशी मस्त बडबड्या मोकळ्या अश्या दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या कुलदैवताला भेट .







मग खाण्याचा वार असल्याने  खास पद्धतीने बनलेले परमेश्वराच्या प्रथमावताराचे अनेकविध प्रकार .नंतर पर्यायाने आलेली झोप . 















 गेले १० महिने कोरोनाच्या संकटामुळे मुलांच्या बाबाने म्हणजे माझ्या मित्राने कोणालाही घराबाहेर पडू दिले नव्हते.  घराच्या आत राहायला आलेली मीच पहिली बाहेरची.  बाहेर हॉटेल मध्ये जेवायला जाणे तर दूरच. आज ती संधी  माझ्या मदतीने साधावी असं मुलं  आणि मित्राच्या बायकोनी ठरवलं. 

त्याप्रमाणे मी विषय काढला. आईला कुठलं हॉटेल आवडत हे मुलांना माहित होते पण बाबाचं  मन  वळवणे  माझ्यावर सोपवलं होते. मित्रानी भलतंच हॉटेल सुचवलं आणि  लगेच तिकडे फोन लावला ,
 २5 डिसेम्बर , सगळं श्रीवर्धन पर्यटकांनी गजबजलेलं. दारू मिळणाऱ्या ठिकाणी तोबा गर्दी असणार हे उघड होते.  तो म्हणे नाही आज फार गर्दी आहे तिथे. नको जायला. 

बायको म्हणे 'पण आपण बाहेर जेवणार म्हणून मी जेवण बनवलच नाही'. मग  मी म्हणे ,' अरे मला दारू नकोय , ते सी विंड हॉटेल चांगलं आहे का?' त्यावर मग तिकडे एकदा चौकशी करून आम्ही सगळे मस्त नटून तयार होऊन हॉटेल मध्ये जेवायला गेलो. .

 मला आज लवकर आडवं होणं खरतर आवश्यक होत . दुसऱ्या दिवशी शेवटचा टप्पा गाठायचा होता आणि तिथे मला दोन पक्षी मित्र दुपारी भेटणार असल्याने वेळेचं बंधन होते. पण पोरांना जेवणांनंतर बीचवर जायची इच्छा झाली . रात्रीच्या शांत वातावरणात सगळेजण थोडा वेळ समुद्राचा खारा वारा  खात  समुद्राची गाज ऐकत उभे राहिलो . आज दिवसभर मित्राच्या दोन्ही मुलांबरोबर वेळ इतका मस्त गेला होता की  त्यांच्या एकमेकांना चिडवण्याच्या युक्त्यांमध्ये मी ही  सामील झाले आणि हसत खिदळत आम्ही घरी पोचलो. अतिशय प्रसन्न आणि दिलखुलास असं हे कुटुंब जणू माझंच झालं होतं. 


श्रीवर्धन दापोली / केळशी  
२६ तारखेला पहाटे ७ च्या जरा आधी श्रीवर्धन सोडलं.














आज दापोलीपर्यंत ६३ कि मी चा  पल्ला जेवणाच्या वेळपर्यंत गाठायचा होता. सायकल सफरीमध्ये  कोकणातल्या  अंतराचा विचार करताना चढ उतारांचा मुद्दा महत्वाचा ठरतो . पहिल्या दिवशी बहुतेक रस्ता सपाटीचा होता . दुसऱ्या दिवशी काही भाग घाट आणि काही सपाट रस्तेही होते. आज निवडलेला मार्ग भरपूर चढ उतारांचा असणार होता. 

   श्रीवर्धन हुन बागमांडला जेट्टीला जाण्यासाठी हरिहरेश्वर गाठावं लागतं  . थोडे किलोमीटर कमी करण्यासाठी कोलमण्डला वरून  जायचा सल्ला मित्राने दिला होता. 
कोलमंडलाला पोचण्यासाठी सुद्धा परत एक डोंगर रंग पार करायची होती. सकाळच्या छान स्वच्छ हवेत चढ त्रासदायक वाटत  नव्हता. आजूबाजूला मस्त जंगल आणि अनेकविध पक्ष्यांचे आवाज आणि हालचाली जाणवत होत्या. 
 पांढऱ्या पोटाचा कोतवाल , शिक्रा , हळद्या jerdons leafbird दिसले. एका ठिकाणी मोर सुद्धा दिसले. सिमीटर बॅबलरचा गूढ असा आवाज आसमंत भरून टाकत होता. 





 











आसमंताचा पुरेपूर आस्वाद घेत कोलमांडला जेट्टी गाठली. घाटाच्या उतारावरूनच बोट लागलेली दिसली पण उगीच तारांबळ न करता माझ्या आटोक्यातल्या वेगात सायकल चालवत जेट्टीवर पोचले.

 राईड सुरु झाल्यापासून स्वतःचा पूर्ण फोटो सायकलिंग च्या वेशात काढून घ्यायचं सुचलं नव्हतं तो  एका पर्यटकाकडून काढून घेतला . 











या सगळ्या सफारी मध्ये जागोजागी मला लोक भेटत ते एक प्रश्न हमखास विचारत. कुठून आलात? मी म्हणे तशी नवी मुंबईहून आणि आज अमक्या ठिकाणाहून . अर्थातच लोकांना गम्मत वाटे. काही जणांनी आठवडा लागला का असे हि विचारले. आत्तासुद्धा काही चौकस पर्यटकांनी हे विचारून घेतले. 

रस्त्यात जेंव्हा एखादी गाडी किंवा बाईक पास होई तेंव्हा कधी चालक हात वर करून दाद देत , कधी गुड मॉर्निग वगैरे म्हणत आणि बहुतेकदा हॉर्न वाजवत. त्या हॉर्नचा उद्देश दाद देणे किंवा ग्रीट करणे आहे हे तेंव्हा लक्षात आलं जेंव्हा हॉर्न वाजवणाऱ्याच्या चेहऱ्याकडे माझं  लक्ष गेलं. त्यावर चिडवणं किंवा बाजूला व्हा सांगणं नसे तर कौतुकमिश्रित हास्य दिसे. सुरुवातीला हॉर्न ऐकून होणारी माझी चिडचिड या जाणीवेनंतर गायब झाली. 


तर सांगत काय होते, कोलमांडला . पलीकडे बाणकोट. सावित्री नदी आपण इथे पार करतो. हि खाडी ओलांडली कि एक रस्ता वेळास कडे जातो आणि दुसरा मंडणगड किंवा केळशी कडे. इथपर्यंत माझे वेळापत्रक बरे जमले  होते.
 बाणकोट ला परत चढ सुरु झाला. तो पार केळशी फाटा येईपर्यंत. केळशी फाट्याला आले तेंव्हा जवळपास १०. ३० झाले होते. मला आश्चर्य वाटलं. अरेच्चा हे तर चुकतंय. अजून जवळपास ४० कि मी बाकी होते . ते ही  खडतर वाटेने . तीन तासात कसे गाठणार आपण. पण आधी पोटपूजा आवश्यक होती. तेंव्हा फाट्यावरच्या एकुलत्या एका हॉटेलात गेले. वडा,  मिसळ काय मागवावे हा विचार करताना अंडा  भुर्जीच चित्र दिसलं . त्याला विचारलं भुर्जी मिळेल का . होकारार्थी उत्तर आलं.

 चहाचे घोट घेत मी हॉटेलच्या वेटरकडे रस्त्याची चौकशी केली. तो म्हणे मंडणगड च्या रस्त्याने लांब पडेल दापोली,  मंडणगडच्या आधी एक फाटाही  दापोलीला जातो पण तो पूर्ण निर्मनुष्य असेल , तुम्हाला गरजेला माणूस भेटणार नाही.  तुम्ही केळशी मार्गानेच  जा. स्थानिक माणसाचा सल्ला ऐकून नाश्ता संपवून मी केळशीच्या रस्त्याला लागले.  केळशीच्या आधी एक रस्ता मांडवली ब्रिज वरून दापोली कडे जातो तिथून जावे असा विचार केला. 

फाट्यावरून अर्धा कि मी.  पासून सुसाट उतार सुरु झाला. रस्ता गुळगुळीत होता. आजूबाजूला वनराई होती. आणि रस्त्याला अगदीच तुरळक वाहने. खाली खाली घरंगळत जायला जी काही मजा आलीय की  विचारता सोय नाही. मधेच एकदा विचार डोकावला ,ही  वाट परत  चढून जायची वेळ आली तर? अशक्य अश्या त्या कल्पनेनी शहारा आला  आणि तो विचार झटकून मी खाली घरंगळत सुटले. उताराच्या शेवटी  फाटा आला. 

कोणाला तरी विचारावे म्हणून थांबले तो पर्यंत दोन तीन स्कुटर बाईक वाले आलेच. सर्वानुमते केळशी बायपास रस्ता अतिशय खराब आणि निर्मनुष्य आहे तेंव्हा केळशीत  जाऊनच दापोली गाठा. फार विचार न करता केळशीच्या दिशेने रपेट मारली. आता वेळाशी  शर्यत सुरु झाली होती. रस्ता झकास होता .

 एकीकडे रस्त्याचा आनंद घेत आणि दुसरीकडे कधी पोचू ? किती वेळ लागेल असा विचार करत  केळशीत पोचले.

 




आम्हा लागूंची कुलदेवी केळशीची महालक्ष्मी . तिच्या उत्सवाच्या निमित्ताने एक दोनदा आणि गोवा कोस्टल सायकल सफरी निम्मित एकदा असं केळशीला  तीनेक वेळा येणं  झालं होतं. आज मात्र  अजेंडा मध्ये देवदर्शन अजिबात नव्हतं आणि तेवढा वेळ ही नव्हता. दीड वाजेपर्यंत दापोली गाठायचं होतं वाजले होते पावणे बारा . २५ कि मी अंतर बाकी होते . चढ उतार लक्षात घेता दापोली गाठायला संध्याकाळ झाली असती. मी व्यावहारिक निर्णय घेतला. सायकल सफरीला केळशीतच दि  एन्ड करायचं . 

कारणे दोन-   एक म्हणजे . आज हवा चांगलीच बदलली होती . हवेतला उष्मा एकदम वाढला होता . पुढचा सगळा  मार्ग चढाचा कारण केळशी समुद्र किनारी आणि दापोली थंड हवेच ठिकाण . माझी तुफान दमछाक झाली असती.
दुसरं कारण  माझ्यासाठी दोन पक्षीमित्र खोळंबून राहिले असते. 

मुळात आनंदासाठी सफर होती . स्वतःला विनाकारण अडचणीत टाकायची काहीच गरज नव्हती. नाक्यावर सामान नेणारे रिक्षा टेम्पो असतात त्यापैकी एकाला बुक केलं. सायकल हौद्यात नीट बांधली आणि चालकाच्या बाजूला असलेल्या चिंचोळ्या जागेत बसून दणादण धक्के खात बरोब्बर दीड वाजता  दापोलीला पोचले. 
एका नव्या प्रकारच्या पर्यटनाची माझी मीच करून  घेतलेली ही  ओळख होती. थोडं काही मोजून मापून , थोडं काही अनपेक्षित असं सगळं वाट्याला आलं. आणि आणखी मोठ्या वेगळ्या वाटा शोधायला मिळणारे  हे दालन मला खुलं झालं. 



- जुई 

                                                                          




42 comments:

  1. अजब सफरी चे अप्रतिम वर्णन. घेऊनच गेलीस तुझ्या बरोबर 😊

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वरदा

      Delete
    2. मस्तच जमलंय.. थोडीशी खाज मलाही सुटलीच तुझे अनुभव वाचून..

      Delete
  2. सुंदर लिहिलंय, आणि त्याला उत्तम फोटोंची जोड, अप्रतिम

    ReplyDelete
  3. सईबाई,सलाम तुझ्या धडाडीला आणि चिकाटी ला खूप मस्त !😊👍

    ReplyDelete
  4. खूप छान वर्णन

    ReplyDelete
  5. juii. this is too good. here are best wishes for more and more rides.

    ReplyDelete
  6. जुई हॅट्स ऑफ टू यू.सायकलिंग आणि ब्लॉग हा फारच सुंदर आहे.You are soo courageous.

    ReplyDelete
  7. धन्यवाद अतुल

    ReplyDelete
  8. खूप सुरेख वर्णन. तूमच्या साहसाला सलाम.

    ReplyDelete
  9. छान लिहीलयस.. लिखाणाला छान फ्लो आहे. हा प्रवास वृत्तांत आहे, तो संक्षिप्तच आणि क्रिस्पी असायला हवा. प्रवास वर्णन मात्र पाल्हाळीक असते.जेवढ्यास तेवढे लिखाण म्हणजे प्राॅपर ब्लाॅग लिखाण..मजा आली..!























    ReplyDelete
  10. जुयाssss जुयाsss फारच सुंदर अनुभव कथन..मी ही प्रवास केला सायकलीवर स्वार होऊन...

    ReplyDelete
  11. काय लिहू जुई ❤️❤️

    ReplyDelete
  12. खूप अभिमान वाटला वाचून. बाबांची आठवण येणं साहजिकच आहे. त्यांना किती आनंद झाला असतां. तुझ्या आवडीचे उपक्रम योग्य ती काळजी घेऊन करते आहेस हे पाहून खूप बरं वाटल. ❤️

    ReplyDelete
  13. मस्तच वाटलं. सरळ, सहज, ओघवतं, खरंखुरं लिहिलं आहेस. बरोबर प्रवास करत असल्यासारखं
    सगळं नजरेसमोर येत राहिलं.. छानच..

    ReplyDelete
  14. Juee!!!! You are such a courageous woman to venture into this all by yourself! Bravo! So proud of you!
    Very beautifully written, got a feel of your journey so closely! Bravo! Live you Juee!

    ReplyDelete
  15. वाह, तुझ्या परिश्रमांचं, उत्साहाचं आणि चिकाटीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नेटकं प्रवाही वर्णन, उत्तम शब्दसंयोजन आणि मुक्तपणे पेरलेली छायाचित्रं यामुळे तुझी आगळी सायकल सफर अगदी तुझ्याबरोबर अनुभवली आहे असंच वाटलं. जियो जुईताई !

    ReplyDelete
  16. सहजसुंदर blog आणि inspiring सुद्धा. तू मस्त सायकल सफर घडवून आणलीस. छान वाटले तुझा blog वाचायला. Keep it up.

    ReplyDelete
  17. You are not less than in proficient writing!! Quiet enticing trip. I have also gathered some cycling gears. Hope to start this soon. Half of this route I have done in the past on BSA sLR. Thanks for Lovely travelogue.

    ReplyDelete
  18. अतिशय सुंदर, प्रवास आणि त्याचं वर्णन दोन्ही. शिवाय उत्तम फोटोंची मेजवानी

    ReplyDelete
  19. Waa Juee, thoroughly enjoyed your adventure tour, that too alone.
    Admired your photography skills, along with your writing skills. Just kept on reading, till you reach your destination.
    Proud of you.

    ReplyDelete
  20. अगं भारीच लिहितेस आणि मस्त अनुभव कथन केलं आहेस. खूप आवडला 👌🤘

    ReplyDelete
  21. जुई तुला लेखन कला पण अवगत आहे हे माहीत नव्हते खुपच सुंदर वर्णन फोटो पण छान आले आहेत शुभांगी काकु

    ReplyDelete
  22. खूप छान...सायकल प्रवास व वर्णन वाचताना आम्हालाही खूप छान सफर घडवून आणली. त्यात तुम्ही जपलेली आणखी एक आवड म्हणजे फोटोग्राफी. खर म्हणजे हे धाडसच आहे पण भविष्यात अशी आव्हान तुम्ही नक्की पेलाल. त्यासाठी शुभेच्छा.
    मी ही आमच्या मित्रांसोबत मुंबई गोवा मुंबई असा सायकल प्रवास केला आहे त्या मुळे येणाऱ्या अडचनी आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुमचे खरच कौतुक.💐💐👏👏

    ReplyDelete